पिलीवजवळ दुचाकींची भीषण धडक; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणासह दोघांचा मृत्यू
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे म्हसवड रोडवरील बागवान टेकाजवळ 26 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजवर्धन बापू शिरतोडे (वय 18, रा. खडकी, ता. माण, जि. सातारा) हा आपल्या स्प्लेंडर (MH 11 CE 5828) दुचाकीवरून पिलीवहून गावी जात होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने एच.एफ. डिलक्स (MH 45 AG 6790) या दुचाकीवरून स्वप्निल (समाधान) शिंगू सुळे, साईराज सुळे आणि गणेश माने (तिघेही वय 18, रा. सुळेवाडी) पिलीवकडे येत होते. 27 फेब्रुवारी रोजी स्वप्निलचा वाढदिवस असल्याने मित्र कपडे खरेदी करण्यासाठी निघाले होते. मात्र, एका चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करताना दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात राजवर्धन शिरतोडे याचे हात-पाय फ्रॅक्चर झाले. त्याला अकलूज येथील रुग्णालयात नेत असताना वेळापूरजवळ त्याचा मृत्यू झाला. स्वप्निल सुळे याला गंभीर दुखापत झाल्याने अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, रात्री दीडच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. साईराज सुळे याचा पाय मोडला असून गणेश माने हाही गंभीर जखमी आहे. दोघांवर अकलूज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वप्निल, साईराज आणि गणेश हे तिघेही बारावीचे विद्यार्थी असून म्हसवड येथे शिक्षण घेत होते. सध्या बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात असताना ही दुर्घटना घडल्याने शैक्षणिक क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे. ‘एमएच-सीईटी’ परीक्षेची तयारी करत उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणांवर काळाने घाला घातला. वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर अंत्यसंस्काराची वेळ आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.