जालन्यात विहिरीत अज्ञात व्यक्तीचा सडलेला मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे मोठे आव्हान
जालना जिल्ह्यातील
रोहनवाडी शिवारात आज दुपारच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळून
आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहनवाडी येथील एका शेतातील विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे
ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता एका पुरुषाचा
मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी
घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.
प्राथमिक अंदाजानुसार मृत व्यक्तीचे वय सुमारे ३५ ते ४०
वर्षे असावे. मृतदेह अनेक दिवसांपासून पाण्यात असल्याने तो फुगलेला आणि ओळखू न
येण्याजोग्या अवस्थेत आहे. त्यामुळे ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे
राहिले आहे. मात्र, मृतदेहाच्या हातावर गोंदवलेली काही नावे
तपासासाठी महत्त्वाची ठरत आहेत. हाताच्या पंजाच्या मागील बाजूस ‘खुशी’ आणि ‘वंश’
अशी नावे गोंदलेली असून हातावर ‘सीमा’ आणि ‘साईनाथ’ अशी नावे आढळली आहेत. या आधारे
पोलिसांनी जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची पडताळणी सुरू केली आहे. हा
मृत्यू आत्महत्या आहे की हत्या, याबाबत अद्याप स्पष्टता
नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या वर्णनाशी
साधर्म्य असलेली व्यक्ती बेपत्ता असल्यास संबंधितांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा
जालना पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात
आले आहे.