सोलापुरात दोऱ्याने साकारली २२x२२ फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असताना एका आगळ्या-वेगळ्या कलाकृतीने सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोलापूरमधील प्रतिभावान चित्रकार विपुल मिरजकर यांनी तब्बल २२ बाय २२ फुटांची भव्य प्रतिमा केवळ दोऱ्याच्या सहाय्याने साकारली आहे. पारंपरिक रंग-तुलिकेऐवजी दोऱ्याचा वापर करून केलेला हा अनोखा प्रयोग शिवप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी जवळपास ८ ते १० दिवसांचा कालावधी लागला. या कामात पाच सहकाऱ्यांनी त्यांना साथ दिली. पारंपरिक चित्रकलेपेक्षा वेगळा आणि नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचा उद्देश असल्याचे विपुल मिरजकर यांनी सांगितले. हा उपक्रम शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मित्र मंडळ आणि सुभाष गुरुजी पवार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही भव्य प्रतिमा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आली आहे. या प्रतिमेमुळे चौकात येणाऱ्या नागरिकांचे आणि शिवप्रेमींचे विशेष लक्ष वेधले जात असून अनेकजण या अनोख्या कलाकृतीसोबत छायाचित्रे काढताना दिसत आहेत.