पंढरपूर दुहेरी हत्याकांडाचा सात महिन्यांनी उलगडा; माहिती देणारा आरोपीच निघाला सूत्रधार

पंढरपूरच्या कुंभार गल्लीत १५ जुलै २०२५ रोजी झालेल्या सुरेखा जगताप आणि लखन जगताप या मायलेकांच्या दुहेरी हत्येचा उलगडा तब्बल सात महिन्यांनंतर झाला आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा छडा लावत दोन मुख्य आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. विशेष म्हणजे, घटनेची माहिती देणारा व्यक्तीच या गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. घटनेची पार्श्वभूमी १५ जुलै २०२५ च्या रात्री डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा लखन आणि त्याची आई सुरेखा यांची त्यांच्या राहत्या घरात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. लखनचे वडील घरी परतले असता दोघांचेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळले. गुन्ह्यानंतर काही वेळातच एका आरोपीने पोलिसांना फोन करून “आमच्या गल्लीत खून झाला आहे” अशी माहिती दिली होती, जेणेकरून संशय आपल्यावर येऊ नये. तांत्रिक तपासाने दिला धागा या प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याने तपास मोठे आव्हान ठरला होता. मात्र, १८ जानेवारी रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. परिसरातील डम्प डेटा, सीडीआर आणि मोबाईल लोकेशन तपासण्यात आले. गुन्ह्याच्या वेळी काही संशयितांचे मोबाईल बंद असल्याचे आढळले. याच दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांचा तपास राजस्थानपर्यंत पोहोचला. जोधपूरमध्ये अटक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जोधपूर येथे सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. खुनानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी वापरलेली धारदार शस्त्रे आणि घरातील ५५ इंची टीव्ही चंद्रभागा नदीत फेकून दिला होता. पोलिसांनी १० आणि ११ फेब्रुवारी रोजी शोधमोहीम राबवून नदीपात्रातून शस्त्रे व टीव्ही जप्त केले.

हत्येमागील कारण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुहेरी हत्येमागे जागेचा वाद आणि अनैतिक संबंध ही दोन प्रमुख कारणे प्राथमिक तपासात समोर आली आहेत. वाद विकोपाला गेल्याने आरोपींनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सध्या पंढरपूर सत्र न्यायालयाने आरोपींना ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.