मथुरामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू; दुधात विष मिसळून आत्महत्येचा संशय

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. महावन तालुक्यातील खप्परपूर गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. मृतदेहांच्या जवळ दुधाचे ग्लास आढळले असून, सर्वांनी दुधात विष मिसळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना रात्री उशिरा घडल्याचा संशय असून सकाळी घरातून कोणीही बाहेर न आल्याने शेजाऱ्यांना संशय आला. मृत व्यक्तींची ओळख ३५ वर्षीय मनीष (शेतकरी), त्याची पत्नी सीमा (वय ३२), पाच वर्षीय मुलगी हनी, चार वर्षीय मुलगी प्रियांशी आणि दोन वर्षांचा मुलगा पंकज अशी झाली आहे. घरात सर्वांचे मृतदेह पडलेले दिसताच ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. घराची तपासणी करताना स्वयंपाकघरातील भिंतीवर आम्ही आत्महत्या करत आहोत” अशी चिठ्ठी आढळून आली आहे. मात्र, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, पोस्टमॉर्टम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मनीषचे दोन भाऊ शेजारीच राहत असून, त्यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे कौटुंबिक तणाव किंवा आर्थिक अडचणींच्या दृष्टीनेही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण खप्परपूर गावात शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील पाच निष्पाप जीवांचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.