सोलापुरात ढाब्यावर आढळल्या ३ ईव्हीएम मशीन; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे एका ढाब्यावर तीन ईव्हीएम मशीन आढळून आल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींसाठी नुकत्याच निवडणुका पार पडल्या. ७ जानेवारी रोजी मतदान झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघात एका ढाब्यावर तीन ईव्हीएम मशीन आढळून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मोहोळ शहराजवळील स्वराज्य बार अँड हॉटेल परिसरात ईव्हीएम मशीन असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते उमेश पाटील यांना मिळाली. त्यानंतर ते कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि हा प्रकार उघडकीस आणला.या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले की, ढाब्यावर ईव्हीएम मशीन सापडणे हा दुर्दैवी आणि गंभीर प्रकार आहे. मात्र, आढळून आलेल्या तीनही ईव्हीएम मशीन अतिरिक्त होत्या आणि त्या मतदानासाठी वापरण्यात आलेल्या नव्हत्या. या मशीन आता स्ट्राँग रूममध्ये स्वतंत्र खोलीत सुरक्षित ठेवण्यात आल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वाहन चालक आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय न झाल्याने हा प्रकार घडला असावा, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ईव्हीएम मशीन वाहतुकीसाठी ठराविक बस किंवा वाहन असते, असे सांगत ढाब्यावर मशीन सापडणे अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला मदत करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.