अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर सहलीच्या एसटी बसचा अपघात; १४ विद्यार्थी जखमी
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण अपघात
घडला. नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाले येथील जिल्हा परिषद शाळेच्या
विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जाणारी एसटी बस टायर फुटल्याने पलटी झाली. या
अपघातात १४ विद्यार्थी आणि ५ शिक्षक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना
गुरुवारी (दि.१२) सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास ओतूर हद्दीतील खामुंडी
(डुंबरवाडी) येथील टोलनाक्याच्या पुढे घडली. अपघातग्रस्त बसचा क्रमांक एमएच १४
एलएक्स ६७४७ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जाणारी बस खामुंडी गावाच्या हद्दीतून जात असताना अचानक बसचा पुढील टायर फुटला. टायर फुटल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. मदतकार्यासाठी ग्रामस्थांची धाव अपघात होताच परिसरातील ग्रामस्थ आणि इतर वाहनचालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले. जखमी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. जीवितहानी टळली या अपघातात काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या असल्या तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बसमध्ये एकूण किती विद्यार्थी होते याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित या घटनेनंतर शालेय सहलींसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालकांकडून अशा वाहनांची नियमित तपासणी करावी आणि सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली जात आहे. या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या सहलीचा आनंद मात्र दुःखात बदलला असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.