इंगळगीत जावयाकडून सासऱ्याची गळा चिरून हत्या; आत्महत्येचाही प्रयत्न
दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावात मंगळवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत जावयाने सासऱ्याची गळा चिरून हत्या केली असून त्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मृत सासरे सिकंदर शेख (वय ५५, रा. इंगळगी) तर आरोपी जावई सादिक (वय ३५, रा. पानमंगरूळ, ता. दक्षिण सोलापूर) असे त्यांची नावे आहेत.२४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सिकंदर शेख हे शेतात काम करत असताना जावई सादिक दफेदार तेथे पोहोचला. घरगुती वाद आणि दीर्घकाळापासून असलेल्या रागातून त्याने सासऱ्याचा गळा चिरला. या हल्ल्यात सिकंदर शेख यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घरी निघाला होता; मात्र ग्रामस्थांना माहिती मिळताच तो घाबरला आणि स्वतःच्या छातीत चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
संशयातून वाढलेले कौटुंबिक वाद
माहितीनुसार, सिकंदर शेख यांना चार मुली व दोन मुले
आहेत. आरोपी सादिक हा तिसऱ्या क्रमांकाचा जावई आहे. त्याची पत्नी मुंबई पोलीस दलात
कार्यरत आहे. पत्नीवर संशय घेणे, मारहाण करणे आणि धमक्या
देणे असे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. सासरे सिकंदर शेख यांनी अनेकदा बैठका
घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. अखेरीस मुलीमार्फत घटस्फोटासाठी खटला
दाखल करण्यात आला होता. याच रागातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी
व्यक्त केला आहे.
पोलिसांत गुन्हा नोंद
घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस स्टेशन चे अधिकारी
घटनास्थळी दाखल झाले. आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.
जखमी आरोपीवर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.