अहमदपूरमध्ये हॉस्टेलमधील ३० हून अधिक विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

(जि. लातूर) : ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदपूर तालुक्यातील थोरलेवाडी येथे शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेच्या हॉस्टेलमध्ये तब्बल ३० ते ३२ चिमुकल्या विद्यार्थ्यांना वेळूच्या काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी Ujwal Prakash Soni (रा. बैतुल, मध्य प्रदेश) याला त्याच्या मोटारसायकलचे नुकसान हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांनी केल्याचा संशय होता.

शुल्लक कारणावरून अमानुष मारहाण

या संशयातून त्याने संतापाच्या भरात विद्यार्थ्यांना अश्लील शिवीगाळ करत वेळूच्या काठीने मारहाण केली. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही खात्री न करता ३० पेक्षा अधिक मुलांना रांगेत उभे करून मारहाण करण्यात आली. मारहाणीदरम्यान आरोपीने “मी या शाळेचा प्राचार्य होणार आहे, तेव्हा तुम्हाला बघून घेतो,” अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे. शिक्षकी पेशाशी संबंधित व्यक्तीकडून अशा प्रकारचे कृत्य घडल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पालकांमध्ये संताप, कारवाईची मागणी

घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासन आणि पोलिसांकडे धाव घेतली. संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या अहमदपूर तालुक्याच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. बालहक्क आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.