मराठा समाजावर राजकीय अन्यायाचा आरोप; सोलापुरात मुंडण आंदोलनातून भाजपचा निषेध

सोलापुरात महापौर निवडीवरून राजकीय वातावरण तापले आहे. मराठा समाजाला महापौरपदात प्राधान्य न दिल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चा ने तीव्र निषेध नोंदवला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव  यांनी मंगळवारी दुपारी छत्रपती शिअवजी महाराज  यांच्या पुतळ्यासमोर स्वतःचे मुंडन करून आंदोलन केले. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे  यांच्यावरही त्यांनी रोष व्यक्त केला.

महापौर निवडीवर नाराजी

यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले असून १०२ पैकी ८७ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, मराठा समाजाची मतदारसंख्या व लोकसंख्या निर्णायक असतानाही महापौरपदी मराठा समाजातील व्यक्तीची निवड झाली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. राम जाधव यांनी रक्ताने पत्र लिहून निषेध व्यक्त केला. “1993 नंतर 32 वर्षे मराठा समाजाला महापौरपदापासून वंचित ठेवण्यात आले. यंदा संधी असतानाही मराठा समाजाचा महापौर करण्यात आला नाही,” असे ते म्हणाले.

राजीनाम्याची मागणी

सोलापूरच्या विद्यमान महापौरांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. “जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील,” अशी भूमिका राम जाधव यांनी स्पष्ट केली.

आंदोलकांचा दावा

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, 1993 नंतर विविध समाजांना महापौरपदाची संधी देण्यात आली, मात्र मराठा समाजाला डावलण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या प्रकरणावर भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.