मोहोळ बसस्थानक परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा; उभारण्यावरून मोहोळमध्ये तणाव
शहरातील बसस्थानक परिसरात शनिवारी रात्री छत्रपती संभाजी
महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अज्ञात व्यक्तींनी बसविल्याने शहरात तणावसदृश
परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी सकाळी पुतळा बसविण्यात आलेल्या ठिकाणी
नागरिकांची मोठी गर्दी झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून मोठा
बंदोबस्त तैनात करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर आणि पोलीस
निरीक्षक बाजीराव पोवार यांनी विविध पक्षांचे नेते, नागरिक, तसेच
तहसीलदार सचिन मुळीक आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
घेतली.
परवानगीबाबत चौकशी
बैठकीत संबंधित जागेची मालकी कोणाची आहे, तसेच पुतळा बसविण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली आहे का, याबाबत माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र देण्यात
आले आहे. बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपव्यवस्थापक मुकेश सिंग,
साईड इंजिनियर सचिन पवार आदी उपस्थित होते. तहसीलदार सचिन मुळीक
यांनी सांगितले की, पुतळा बसविण्यासाठी लेखी परवानगी देण्यात
आली आहे का, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे पत्र संबंधित
विभागाला देण्यात आले आहे.
मोठा पोलिस बंदोबस्त
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून
संबंधित ठिकाणी राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, शीघ्रकृती दलाची एक तुकडी, सात पोलीस अधिकारी आणि ५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान,
नागरिकांनी शांतता राखावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.