रत्नापूर पाटीजवळ भीषण अपघात; चार दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या वधू-वरांचा मृत्यू

जिल्ह्यातील रत्नापूर पाटीजवळ  सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्ग वर रविवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुण वधू-वरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने Washi तालुक्यात शोककळा पसरली आहे.

मृतांची ओळख

अपघातात मृत्यू झालेल्यांची ओळख अक्षय रामभाऊ शिनगारे (वय २५) आणि अक्षया सुनील चव्हाण (वय २३) अशी झाली आहे. १५ फेब्रुवारी रोजी मांजरसुंबा येथील कन्हैया मंगल कार्यालयात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. विवाहाची तयारी सुरू असतानाच झालेल्या या घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अपघात कसा घडला?

अक्षया चव्हाण हिची लातूर येथे परीक्षा असल्याने ती पहाटे वाशी येथून Nexon (MH 25 BF 5064) कारने निघाली होती. कारमध्ये अक्षय शिनगारे आणि चालक अक्षय यादव सिरसट (वय २२) हे दोघेही होते. रत्नापूर पाटीजवळील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार थेट येडशी टोल नाका येथील कमानीवर आदळली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. अक्षय आणि अक्षया यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला.

पोलिसांची कारवाई

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी चालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह येरमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले. या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अधिक तपास सुरू आहे.