“माझं पार्लर बंद केलं…”; सासरीच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस
आली आहे. नातेपुते परिसरातील खुळेवाडी येथे राहणाऱ्या २२ वर्षीय पायल शशिकांत
रणदिवे हिने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या
माहितीनुसार, पायलला स्वतःचे ब्युटी पार्लर सुरू
करण्याचे स्वप्न होते. त्यासाठी तिने प्रशिक्षण वर्गही लावला होता. मात्र सासरच्या
मंडळींकडून तिच्या या इच्छेला विरोध करण्यात आला, असा आरोप
नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळी तिने राहत्या घरी गळफास घेऊन
आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी
घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
हातावर लिहिलेला संदेश
आत्महत्येपूर्वी पायलने आपल्या तळहातावर पेनने काही शब्द
लिहिल्याचे सांगितले जात आहे. “माझं हसू झालंय… माझं पार्लर बंद केलं… जीव होता तो
माझा… स्वप्न होतं गं… आजपर्यंत शांत बसले पण आता नाही… चांगल्या आई-बापाची लेक
आहे म्हणून निघूनही नाही गेले… माझ्यामुळे त्रास झाला असेल तर माफी मागते…” असा
मजकूर तिच्या हातावर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सासरच्या
जाचाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप होत असून पोलिसांकडून पुढील तपास
सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. घटनेमुळे नातेपुते परिसरात
हळहळ व्यक्त केली जात आहे.