पोलीस भरतीदरम्यान १६०० मीटर धावताना २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संभाजीनगरात हृदयद्रावक घटना

पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली असून २३ वर्षीय तरुणाचा १६०० मीटर धावण्याच्या चाचणीवेळी मृत्यू झाला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर शनिवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संग्राम धोंडीराम शिंदे हा सांगली जिल्ह्यातील रहिवासी होता. पोलीस दलात भरती होऊन कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न घेऊन तो संभाजीनगरमध्ये दाखल झाला होता. शनिवारी सकाळी सुमारे ८:१५ वाजता १६०० मीटर धावण्याची चाचणी सुरू झाली. संग्रामने उत्साहात धावण्यास सुरुवात केली; मात्र काही अंतर पार केल्यानंतर त्याला अचानक चक्कर आली आणि तो धावपट्टीवरच कोसळला. त्याला तातडीने वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तीव्र शारीरिक ताण किंवा हृदयविकाराचा झटका यामुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच अधिकृत कारण स्पष्ट होणार आहे. संग्राम हा जिद्दी आणि मेहनती तरुण म्हणून ओळखला जात होता. गेल्या अनेक महिन्यांपासून तो कठोर सराव करत होता. त्याच्या अकस्मात निधनाने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर काही काळ भरती प्रक्रिया थांबवण्यात आली. मैदानावर उपस्थित असलेल्या हजारो उमेदवारांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले. उमेदवारांनी शारीरिक चाचणीपूर्वी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि अति ताण टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे.