राजस्थान-पुणे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; ३.९२ कोटींचा एमडी जप्त, सहा जण अटकेत

राजस्थानातून टप्प्याटप्प्याने पुण्यात मेफेड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ आणून त्याची विक्री केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे. Pune Police यांच्या खराडी पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ९२ लाख रुपये किमतीचा एमडी जप्त करण्यात आला आहे. ‘परिमंडळ सात’चे उपायुक्त सोमय मुंडे आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आरोपींची नावे

अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोतीसिंह राजपुरोहित (२८), हरीश रामदेवासी (२२, दोघेही रा. वाघोली), योगेश उर्फ मनीष बिश्नोई (३०, रा. चामु, जि. जोधपूर, राजस्थान), सचिन उर्फ एस. के. बिश्नोई (२०), अमित घुले (४०, रा. मांजरी) आणि रतनलाल जाठ (२०) तसेच रामकरण जाट उर्फ चौधरी उर्फ सियाग (३४) यांचा समावेश आहे.

राजस्थानहून पुरवठा

प्राथमिक तपासात राजस्थानातून एमडीचा साठा पुण्यात आणला जात असल्याचे उघड झाले आहे. आरोपी हे वेगवेगळ्या टप्प्यांत ड्रग्जची वाहतूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार व इतर सहकाऱ्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.