जळगावात फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या; प्राचार्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
शहरात धक्कादायक घटना घडली आहे. देवकर कॉलेज येथे द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय
विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.
१६) सायंकाळी उघडकीस आली. मृत विद्यार्थ्याचे नाव श्याम प्रभाकर पाटील (वय १९, रा. बोदवड) असे आहे. तो जळगावात भाड्याच्या खोलीत राहत होता. रविवारी
त्याचे रूममेट गावाला गेल्याने तो एकटाच होता. सायंकाळी सुमारे ६ वाजता त्याने
गळफास घेतल्याचे समोर आले.
सुसाईड नोटमध्ये प्राचार्यांवर आरोप
घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत श्यामने आपल्या मृत्यूला
महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पवार यांना जबाबदार धरले आहे. मित्रांच्या भांडणात
मध्यस्थी करताना सर्वांसमोर अपमान व मारहाण झाल्याचा उल्लेख त्याने केला आहे. पत्रात
“माझी कोणतीही चूक नसताना मला सर्वांसमोर मारहाण करण्यात आली,” असे लिहिले असून, अपमान सहन न झाल्याने हा टोकाचा
निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे. पत्राच्या शेवटी त्याने आपल्या मित्राला भावनिक
संदेशही लिहिला आहे.
रुग्णालयात संतप्त वातावरण
घटनेची माहिती मिळताच जळगाव शासकीय रुग्णालयात
नातेवाईकांची मोठी गर्दी झाली. दोषींवर तत्काळ कारवाई करून अटक झाल्याशिवाय मृतदेह
ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती.
वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
मृत विद्यार्थ्याचे वडील प्रभाकर पाटील यांनी पोलिसांत
फिर्याद दाखल केली आहे. त्यात प्राचार्य योगेश पवार यांनी मारहाण केल्याने मुलाने
आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून संबंधितांविरोधात
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
महत्त्वाची नोंद:
जर आपण किंवा आपल्या ओळखीतील कोणी मानसिक तणावात असेल, नैराश्याचा सामना करत असेल, तर तात्काळ मदत घेणे
आवश्यक आहे. जवळच्या कुटुंबीयांशी, मित्रांशी किंवा तज्ज्ञ
समुपदेशकांशी संपर्क साधा. संकटाच्या प्रसंगी स्थानिक हेल्पलाईन किंवा आपत्कालीन
सेवांशी संपर्क करावा.