अहिल्यानगरमध्ये मुलाने आईचा निघृण खून; मृतदेहाशेजारी गोट्या खेळत बसल्याची धक्कादायक घटना

सावेडी उपनगरातील नवलेनगर परिसरात मंगळवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अत्यंत धक्कादायक घटना घडली. मुलाने स्वतःच्या आईची कैऱ्या कापण्याच्या अडकित्त्याने हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बेबी सुधाकर गवारे (वय ६०, रा. गजानन मंदिरासमोर, नवलेनगर, सावेडी) असे मृत महिलेचे नाव असून, सुहास सुधाकर गवारे (३३) असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पैशांच्या वादातून हत्या

आई-मुलगा नवलेनगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. वडिलांचे निधन झालेले असून आई घरकाम करून उदरनिर्वाह करत होती. आरोपी मुलगा वारंवार पैशांची मागणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी पैशांवरून वाद झाल्यानंतर आरोपीने आईला बेडरूममध्ये डांबून ठेवले आणि रागाच्या भरात कैऱ्या कापण्याच्या अडकित्त्याने वार करत तिची हत्या केली.

मृतदेहाशेजारी गोट्या खेळत बसला

घटनेनंतर आरोपी घरातच पलंगावर बसून गोट्या खेळत असल्याचे पोलिसांना खिडकीतून दिसले. दरवाजा आतून पलंग व धान्याच्या कोठ्यांनी अडवण्यात आला होता. पोलिसांनी दरवाजा उघडण्यास सांगितले, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनुसार, आरोपी स्वतःशीच बडबड करत होता आणि हातातील कात्री, अडकित्ता व गोट्या दाखवत होता. त्याने चौकशीदरम्यान “माझ्याकडून चूक झाली” अशी कबुली दिल्याचे सांगितले जाते.

शवविच्छेदन व तपास सुरू

मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर होता की नशेच्या अवस्थेत होता, याचा तपास केला जात आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिली.

बहिणीची तक्रार

मृत महिलेची मुलगी सुवर्णा दिगंबर घुले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी सुहास गवारे याच्याविरोधात खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.