स्पर्धा परीक्षेच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या; “माझी पुस्तकं गरजू विद्यार्थ्यांना द्या” अशी चिठ्ठी

राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असताना, यश-अपयशाच्या तणावातून काही जण टोकाचे निर्णय घेत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. अशाच प्रकारची घटना लातूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अमित उत्तम सोनकांबळे (वय २७, रा. शेळगाव, ता. चाकूर, जि. लातूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मागील चार वर्षांपासून लातूरमधील संभाजीनगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.

काय घडलं नेमकं?

सोमवारी (दि.१६) सकाळी सुमारे दहा वाजता त्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने, आई-पप्पा, तुम्हाला सोडून जाऊ वाटत नाही. पण गेल्या चार वर्षांपासून तुमच्यापासून दूर राहण्याचा कंटाळा आला आहे. मला या सगळ्याचा वैताग आला आहे,” असा भावनिक उल्लेख केला आहे. तसेच, माझ्या मृत्यूनंतर माझी पुस्तकं गरजू विद्यार्थ्यांना द्या. त्यांना ती अभ्यासासाठी उपयोगी पडतील,” अशी विनंतीही त्याने केली आहे.

नैराश्याची छाया

सलग चार वर्षे कुटुंबापासून दूर राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आलेला मानसिक ताण आणि नैराश्य यामुळेच त्याने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.