परीक्षेला निघतानाच वडिलांचे निधन; खंबीर धनश्रीने दिला दहावीचा पहिला पेपर

दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एका विद्यार्थिनीवर दु:खाचा डोंगर कोसळला. परीक्षा द्यायला निघतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले. मात्र या कठीण प्रसंगातही ती खंबीर उभी राहिली आणि तिने पहिला पेपर पूर्ण केला. धनश्री भिकाजी पवार ही शरदचंद्र पवार प्रशाला येथे दहावीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी मराठीचा पहिला पेपर होता. सकाळी ती भु. म. पुली कन्या प्रशाला या परीक्षा केंद्रावर जाण्याच्या तयारीत होती. याच वेळी रुग्णालयात डायलिसिस उपचार घेत असलेल्या तिचे वडील भिकाजी पवार यांचे निधन झाल्याची बातमी आली. अचानक आलेल्या या धक्क्याने धनश्री पूर्णपणे खचून गेली. अशा प्रसंगी परीक्षा देण्याची मानसिक तयारी तिची नव्हती. मात्र कुटुंबीय, शिक्षक आणि नातेवाईकांनी तिला धीर दिला. शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या भावनेने धनश्रीने स्वतःला सावरले. ती परीक्षा केंद्रावर पोहोचली आणि मराठीचा पहिला पेपर दिला. या धाडसी निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून कौतुक केले जात आहे. प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता उभे राहण्याचा आदर्श धनश्रीने इतर विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे. तिच्या या जिद्दीला सर्व स्तरातून सलाम केला जात आहे.