सोलापुरात पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैध डान्सबार? आमदार सुभाष देशमुख यांचा विधानसभेत गंभीर आरोप

सोलापूर: शहरात काही ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैधरित्या डान्सबार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत केला. या डान्सबारमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असून सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच संबंधित आस्थापनांवर तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. देशमुख यांनी सांगितले की, सोलापूर शहरासह विशेषतः दक्षिण तालुक्यातील काही ग्रामीण भागांतही अवैधरित्या डान्सबार सुरू आहेत. यासंदर्भातील काही व्हिडिओ क्लिप त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाकडे सादर केल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. संबंधित व्हिडिओनंतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी डान्सबारमध्ये जाऊन पाहणी केली. मात्र अधिकारी बाहेर येताना दिसत असले तरी संबंधित ठिकाणी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर हे डान्सबार पोलिसांच्या संरक्षणाखालीच सुरू असल्याचा संशय निर्माण होत असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारांवर तात्काळ कठोर कारवाई करून जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. दरम्यान, गृहराज्यमंत्री पंकज  भोयर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका सभागृहात मांडली. त्यामुळे आता प्रशासनाकडून नेमकी कोणती पावले उचलली जातात, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.