नाशिकमध्ये प्रियकराकडून अपहरणाचा प्रयत्न; डोळ्यात मिरचीची पूड टाकून हल्ला
नाशिक शहरातील
कामगार नगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नास नकार मिळाल्याचा आणि
मोबाईल नंबर ब्लॉक केल्याचा राग मनात धरून प्रियकराने तरुणीच्या अपहरणाचा कट
रचल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशन येथे संशयित आनंद राजभर याच्याविरुद्ध गुन्हा
दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद राजभर आणि संबंधित तरुणी यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनी
लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. मात्र, तरुणीच्या
पालकांनी या लग्नास ठाम नकार दिला. त्यानंतर तरुणीनेही आनंदसोबतचे संबंध तोडण्याचा
निर्णय घेत त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. या गोष्टीचा राग मनात धरून आनंदने ‘तू
माझी नाही तर दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही’ या विकृत मानसिकतेतून तीन
मित्रांना तरुणीवर पाळत ठेवण्यास सांगितले. संबंधित तरुणी सातपूरच्या कामगार नगर
येथील किराणा दुकानात आली असता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तिला रस्त्यात अडवले.
त्यांनी तिच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न
केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत आरडाओरडा
केल्याने आरोपी घाबरले आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू
करून मुख्य आरोपी आनंद राजभर याला अटक केली आहे. इतर साथीदारांचा शोध सुरू असून
पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत.