नागपुरात मोकाट वळूचा हल्ला; ६४ वर्षीय महिला गंभीर जखमी

नागपूर शहरातील सन्मान नगर परिसरात मोकाट जनावरांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घरासमोर स्वच्छता करत असताना ६४ वर्षीय वंदना देवीकर यांच्यावर मोकाट वळूने अचानक हल्ला केला. माहितीनुसार, देवीकर या आपल्या घरासमोर झाडू मारत असताना रस्त्यावर फिरणारा वळू अचानक त्यांच्या दिशेने धावत आला. काही समजण्याआधीच त्याने जोरदार धडक देत त्यांना जमिनीवर आपटले आणि शिंगांनी तुडवत गंभीर जखमी केले. हल्ला इतका अचानक होता की शेजाऱ्यांना मदतीला धाव घेण्याची संधीही मिळाली नाही. आरडाओरड ऐकून स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत वळूला हुसकावून लावले आणि जखमी अवस्थेत देवीकर यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणीत त्यांच्या बरगड्या तसेच हात-पायांतील काही हाडे मोडल्याचे स्पष्ट झाले. डोक्याला जबर मार लागल्याने मेंदूला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास तीन आठवडे त्या अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत होत्या. सध्या त्या घरी उपचार घेत असून कृत्रिम ऑक्सिजनच्या सहाय्याने प्रकृती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, हल्ला करणारा वळू अद्याप त्याच परिसरात मोकाट फिरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून महानगरपालिकेच्या जनावर पकडणाऱ्या पथकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.