अजित पवार अपघातप्रकरणी बारामतीत एफआयआरची मागणी; रोहित पवार पोलिस ठाण्यात दाखल

अजित पवार  यांच्या अपघाताबाबत उपस्थित झालेल्या शंकांनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार आज बारामती  येथील पोलिस ठाण्यात जाऊन अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यापूर्वी रोहित पवार यांनी मुंबई  येथील मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांची तक्रार स्वीकारण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी बारामती येथे गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला. रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे वडील राजेंद्र पवार तसेच युगेंद्र पवार उपस्थित होते. बारामती पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने समर्थकांनी गर्दी केली. ‘एकच वादा अजितदादा’, ‘अमर रहे अजितदादा’, ‘परत या अजितदादा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. समर्थकांनी अपघाताची सखोल चौकशी करून एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, अपघातप्रकरणी DGCA आणि VSR कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्यास मरीन लाईन्स पोलिसांनी नकार दिल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. गुन्हा दाखल न करण्यामागे कोणाचा दबाव आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी पोलिस आणि रोहित पवार यांच्यात बाचाबाची झाल्याचेही सांगितले जाते. बारामतीत तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरू असताना समर्थकांनी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाची भूमिका घेतली. अजित पवारांना न्याय मिळावा आणि अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी पवार कुटुंबीय आणि बारामतीकरांनी केली आहे.