रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन; स्टेज ४ यकृत कर्करोगाशी झुंज अपयशी
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय
संघातील महत्त्वाचा खेळाडू रिंकू सिंह याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे
वडील खाचंद्र सिंह यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती
खालावत होती आणि त्यांना नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात
आले होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खाचंद्र सिंह हे स्टेज ४ यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत
होते. अनेक दिवसांपासून ते मेकॅनिकल व्हेंटिलेटर सपोर्टवर होते आणि त्यांना सतत
रेनल रिप्लेसमेंट थेरपी दिली जात होती. अखेर त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळताच रिंकू सिंहने
तातडीने संघ शिबिर सोडून घरी धाव घेतली. मंगळवारी चेन्नईतील M. A.
Chidambaram Stadium येथे सराव सत्र आयोजित करण्यात
आले होते; मात्र रिंकू त्यात सहभागी झाला नव्हता. त्यानंतर त्याला
वडील गंभीर असल्याची बातमी मिळाली आणि तो त्वरित अलिगडला रवाना झाला. रिंकू सिंह हा उत्तर प्रदेशातील अलिगडचा रहिवासी आहे.
आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी खाचंद्र सिंह यांनी घरोघरी गॅस सिलेंडर
पोहोचवण्याचे कष्टाचे काम केले. काही दिवसांपूर्वीच रिंकूने वडिलांना महागडी गाडी
भेट दिली होती. २४ फेब्रुवारी रोजी त्याने वडिलांची घेतलेली भेट हीच शेवटची ठरली. वडिलांच्या निधनानंतर रिंकू सिंह टी-२० स्पर्धेत सहभागी
होणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, क्रीडा क्षेत्रातून आणि चाहत्यांकडून सिंह कुटुंबाला
श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.