नवी मुंबईतील तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग; दाट धुरामुळे नागरिक त्रस्त
नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील डंपिंग ग्राउंडला
शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. कचऱ्याचे प्रचंड ढिग जळू लागल्याने
संपूर्ण परिसरात काळपट आणि दाट धुराचे लोट पसरले आहेत. या धुरामुळे लगतच्या
वसाहतींमधील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले
आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीची
तीव्रता लक्षात घेता वाशी, नेरुळ, कोपरखैराणे,
ऐरोली, बेलापूर तसेच एमआयडीसी विभागातील
अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पथके तातडीने दाखल झाली. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली आग
धुमसत असल्याने ती पूर्णपणे विझवणे आव्हानात्मक ठरत आहे. सुदैवाने या आगीत अद्याप
कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, डंपिंग ग्राउंडला
वारंवार लागणाऱ्या आगींमुळे तुर्भे आणि वाशी परिसरातील हवेची गुणवत्ता खालावत
असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. धुरामुळे प्रदूषणाचा धोका वाढला असून
नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आग नेमकी
कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन
करण्यात आले आहे.