शिरूरमध्ये भीषण अपघात; हरिनाम सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले, महिला गंभीर

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आंबळे येथे गुरुवारी (२९ ऑक्टोबर) रात्री भीषण अपघात घडला. अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर पायी घरी परतणाऱ्या झेंडे कुटुंबातील तिघांना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे आंबळे गावावर शोककळा पसरली आहे. शिरूर-चौफुला रस्त्यावरील हॉटेल केसरीसमोर रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. आंबळे येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात खोले महाराज यांचे कीर्तन होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर झेंडे कुटुंबातील सदस्य पायी घरी परतत होते. त्याचवेळी भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कौशल्या वसंत झेंडे, आरुषी दत्तात्रय झेंडे आणि सोहम राजीव झेंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातातील आणखी एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू झाल्याने आंबळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. धार्मिक कार्यक्रमातून घरी परतताना घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. मृत तिघांवर शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता आंबळे येथील स्मशानभूमीत एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.