“कैसा हराया…” म्हणणाऱ्या सहर शेख नॉट रिचेबल; नगरसेवक पद धोक्यात येताच गायब ?
ठाणे : महापालिका निवडणुकीत चर्चेत आलेल्या AIMIMच्या नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. जात प्रमाणपत्र
मिळवताना शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला
असून, त्यांच्या नगरसेवकपदावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले
आहे. मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झाल्यानंतर
“कैसा हराया…” या वक्तव्यामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या सहर शेख आता कायदेशीर
अडचणीत सापडल्या आहेत. तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांनी
चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र मिळवले असून, त्याच आधारे
सहर शेख यांनी निवडणूक लढवली. गाझियाबाद येथील मूळ रहिवासी असलेले त्यांचे वडील युनूस
शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतर लागू असलेल्या नियमांऐवजी वेगळा नमुना
वापरून प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल
करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. याबाबत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी
समितीकडे तक्रार करण्यात आली असून अहवाल लवकरच अपेक्षित आहे. तक्रारदार सिद्दीकी
फराह शबाब अहमद यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल
करण्याची मागणी केली आहे. त्या देखील याच प्रभागातून उमेदवार होत्या. तपासादरम्यान
ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. काही सुनावण्यांना युनूस शेख
अनुपस्थित राहिल्याची माहिती आहे, तर तहसीलदारांनी सादर कागदपत्रांमध्ये
त्रुटी असल्याचे निदर्शनास आणले आहे.
तसेच, ठाण्यात वास्तव्यास असताना मुंबई येथून
जात प्रमाणपत्र का घेण्यात आले, यावरही प्रश्न उपस्थित केले
जात आहेत. दरम्यान, सहर शेख आणि त्यांचे वडील सध्या
संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर
त्यांच्या राजकीय भवितव्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.