सोलापुरात रमजान ईद उत्साहात; ईदगाह मैदानांवर सामूहिक नमाज, एकतेचा संदेश

सोलापूर : रमजान ईदनिमित्त सोलापूर शहरातील विविध ईदगाह मैदानांवर पहाटेपासूनच श्रद्धा, शांतता आणि एकतेचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली आणि सर्वांसाठी सुख-शांतीची प्रार्थना केली.

महिनाभर चाललेल्या रमजानच्या उपवास, संयम आणि आध्यात्मिक साधनेनंतर आलेल्या ईदने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. रोजे पाळत, कुरआन पठण करत आणि शिस्तीचे पालन करत मुस्लिम बांधवांनी आत्मशुद्धी साधली. तसेच जकात आणि फित्रा देऊन गरजू घटकांनाही सणाचा आनंद मिळावा याची काळजी घेतली. ईदगाह मैदानांवर मोठी गर्दी उसळली होती. नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना गळाभेट देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या. यामुळे समाजातील बंधुभाव आणि आपुलकी अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. होटगी रोड परिसरातील आलमगीर ईदगाह येथे शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली यांनी नमाज अदा केली. आसार मैदान ईदगाह येथे सकाळी साडेदहा वाजता नमाज पार पडली. अहले हादिस ईदगाह रंगभवन येथे सकाळी साडेसात वाजता हजारो बांधव उपस्थित होते. येथे मौलाना ताहेर बेग यांनी नमाज पठण केली. पांगल मैदान येथील शाही आलमगीर ईदगाह येथे सकाळी नऊ वाजता नमाज झाली. मौलाना सय्यद अहमद गौरी यांनी नमाजनंतर सामूहिक प्रार्थना केली. तसेच जुनी मिल परिसरातील ईदगाह येथेही मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. ईदच्या निमित्ताने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी नवीन कपडे परिधान करून, सुगंधित इत्र लावून आणि डोळ्यात सुरमा घालून नमाज अदा केली. नमाजनंतर पारंपरिक गोड पदार्थांचा आस्वाद घेत एकमेकांना घरी येण्याचे निमंत्रण देण्यात आले.

समानता, क्षमा आणि मानवतेचा आदर्श म्हणजे ईद
ईदच्या निमित्ताने मानवता, प्रेम आणि बंधुभावाचा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या जीवनातून क्षमा आणि समानतेचा आदर्श समोर येतो. द्वेष सोडून प्रेम आणि समानतेने वागण्याचा संदेश समाजाला मिळतो.
मुफ्ती सय्यद अमजदअली

भेदभाव आणि स्वार्थ सोडण्याचे आवाहन
फक्त नमाज आणि रोजे पुरेसे नाहीत, तर वर्तनात बदल आवश्यक आहे. नफरत, भेदभाव आणि स्वार्थ सोडून प्रेम, बंधुभाव आणि मानवता जपावी, असे आवाहन करण्यात आले.
मौलाना ताहेर बेग

शांतता आणि ऐक्य हीच खरी ईद
रमजान आपल्याला संयम आणि त्याग शिकवतो. ईद हा गरजूंच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा दिवस असून समाजात शांतता आणि ऐक्य टिकवणे हीच खरी ईद आहे.
मौलाना सादिक मणियार

ईदचा खरा अर्थ – मानवता
नफरत पसरवू नका, गरजूंना मदत करा आणि एकमेकांचा आधार बना. समाजात एकता आणि शांतता टिकली तरच देशाची प्रगती शक्य आहे.
सय्यद मोहम्मद खतीब

प्रेम, करुणा आणि सहकार्याचा संदेश
इस्लाम धर्म मानवतेचा संदेश देतो. द्वेष, मत्सर टाळून प्रेम, करुणा आणि सहकार्याने समाजात शांतता निर्माण होते.
मौलाना सय्यद अहमद गौरी

एकूणच, रमजान ईदनिमित्त सोलापूर शहरात प्रेम, आपुलकी आणि एकतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.