जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद; पुण्यात जिवलग मित्रावर कोयत्याने हल्ला,
पुणे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून, जुन्या मैत्रिणीला कॉल करण्याच्या वादातून जिवलग मित्रावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भारती विद्यापीठ
परिसरात २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली असून संपूर्ण
प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या
प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेत आदित्य कांबळे हा गंभीर जखमी झाला असून,
त्याच्यावर चेतन चव्हाण या त्याच्या जिवलग मित्राने
कोयत्याने सपासप वार केल्याचे उघड झाले आहे. हल्ल्यात आदित्यला ३० टाके पडले
असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयाच्या
अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य कांबळे आणि चेतन चव्हाण हे दोघेही जुने मित्र आहेत. २ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी दोघे भारती विद्यापीठ परिसरातील एका रसवंती गाडीजवळ उभे राहून गप्पा मारत होते. यावेळी त्यांच्या जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला. त्या मैत्रिणीला फोन करण्यावरून “कॉल कोण करणार?” या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद असलेला हा प्रकार काही क्षणांतच टोकाला गेला.
भररस्त्यात कोयत्याने जीवघेणा हल्ला
वाद विकोपाला जाताच चेतन चव्हाणने तिथेच असलेला कोयता उचलला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आदित्य कांबळे पळू लागला. मात्र चेतनने त्याचा पाठलाग करून त्याला गाठले आणि भररस्त्यात कोयत्याने सपासप वार केले. आदित्यने हल्ला थोपवण्याचा प्रयत्न करताना हाताने प्रतिकार केला, मात्र तो रस्त्यावर कोसळला. तरीही चेतनने वार सुरूच ठेवले. या थरारक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
३० टाके, डोक्याला गंभीर इजा
स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी आदित्यला भारती
विद्यापीठ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला शरीरावर ३० टाके पडले असून डोक्याला गंभीर इजा झाली आहे. त्याची
प्रकृती सध्या स्थिर असली तरी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
पोलिसांवर नातेवाईकांचे आरोप
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आदित्यच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. हत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) या गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात न आल्याचा त्यांचा आरोप असून, केवळ धारदार शस्त्राने गंभीर दुखापत या कलमाखाली गुन्हा दाखल केल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून आरोपी चेतन चव्हाणविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.