गरजू महिलांना आमिष; बीजांड विक्री रॅकेटचे धागेदोरे नाशिक-नागपूर ते बेंगळुरूपर्यंत,आरोपी महिलांच्या फोनमधून रेटकार्ड उघड

गरजू महिलांना आर्थिक आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील बीजांडांची विक्री करणाऱ्या टोळीचे धागेदोरे राज्याबाहेरपर्यंत पोहोचल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन महिलांच्या मोबाईल फोनमधील संपर्कातून नाशिक , नागपूर  तसेच तेलंगणा आणि बेंगळूरू येथील दुवे उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

बदलापूरमधील जोवेली भागात परिमंडळ चारच्या पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली. प्राथमिक तपासात या टोळीने तीनशेहून अधिक गरजू महिलांना आर्थिक आमिष दाखवून त्यांना इंजेक्शनद्वारे बीजांडांची वाढ केली. त्यानंतर संबंधित महिलांना विविध रुग्णालयांमध्ये नेऊन त्यांची बीजांडे काढून त्याची विक्री करण्यात येत असल्याचे उघड झाले. ही कारवाई बदलापूरसह विठ्ठलवाडी आणि वांगणी परिसरातही करण्यात आली.

मोबाईल तपासातून मोठे धागेदोरे

अटक आरोपी महिलांच्या मोबाईल फोनमधील चॅट, कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बीजांडांची विक्री ७० ते ८० हजार रुपयांपर्यंत केली जात होती, तर संबंधित महिलांना सुमारे ३० हजार रुपये दिले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात काही मोठी रुग्णालये आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात असून तपास यंत्रणांनी अधिक चौकशी सुरू केली आहे. पोलिसांकडून या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला जात असून पुढील तपास सुरू आहे.