नाशिकमध्ये आज सिंहस्थ कुंभमेळ्याचा महाध्वजारोहण सोहळा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

नाशिक : आगामी २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज, शनिवार ३१ ऑक्टोबर रोजी महाध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री नाशिकमध्ये दाखल होत आहेत. सुमारे दीड हजार व्हीआयपी व्यक्तींच्या उपस्थितीचा अंदाज असल्याने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शुक्रवारी रात्रीच नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी राष्ट्रपतींच्या दौऱ्याची आणि ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून नियोजनाचा आढावा घेतला.

दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सकाळी १२ वाजून २ मिनिटांनी महाध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती त्र्यंबकेश्वरकडे रवाना होतील. तेथे कुशावर्त येथे पूजा केल्यानंतर त्या नाशिकमधील पोलीस अकादमी येथे विश्रांतीसाठी परतणार आहेत. सायंकाळी गोदाआरतीला उपस्थित राहण्याचाही त्यांचा कार्यक्रम आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री उपस्थित राहणार

या सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ, जयकुमार रावल, डॉ. अशोक उईके, राधाकृष्ण विखे पाटील, गुलाबराव पाटील, आकाश फुंडकर आणि नीतेश राणे यांच्यासह अनेक मंत्री सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

प्रशासनाकडून सुरक्षा आणि वाहतुकीचे नियोजन

नाशिक कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेकडून सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपतींसह अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने सुरक्षा, वाहतूक, निवास, स्वागत व्यवस्था आणि आपत्कालीन यंत्रणांची तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी रात्री संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून या व्यवस्थांचा आढावा घेतला. दरम्यान, साधू-महंतांच्या नाराजीमुळे प्रशासनासमोरील आव्हाने वाढल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सोहळ्याचे नियोजन सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला विशेष काळजी घ्यावी लागत आहे.

धार्मिक विधींसाठी गुरुजी मिळणे कठीण

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धार्मिक कार्यक्रमांची लगबग वाढली आहे. शुक्रवारी ग्रामप्रदक्षिणा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात रामकुंड परिसरातील दशक्रिया विधी, उत्तरकार्य तसेच सत्यनारायण पूजा, कलशपूजन आणि गृहप्रवेश यांसारखे विधी करणारे अनेक गुरुजी सहभागी झाले. त्यामुळे गृहप्रवेश किंवा अन्य पूजाविधी करण्यासाठी गुरुजी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. काही यजमानांना पूजाविधींसाठी किमान दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.

व्हीआयपींच्या स्वागतासाठी नाशिक सजले

महाध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक शहर सजवण्यात आले आहे. शहरातील विविध भागांत भगवे ध्वज आणि पताका लावण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी स्वागताची प्रतीके उभारण्यात आली असून, धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या दृष्टीनेही या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.