कलावती नगरमध्ये पती-पत्नीचे मृतदेह सापडले; आत्महत्या की घातपात?
सोलापूर शहरातील कलावती नगर
परिसरात शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या
हद्दीत राहत्या घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमनाथ धानोप्पा पाटील (वय ४०) आणि श्रीदेवी सोमनाथ
पाटील (वय ३५) अशी मृतांची नावे असून ते मूळचे शिरवण (ता. दक्षिण सोलापूर) येथील
रहिवासी होते. सध्या ते कलावती नगर येथे वास्तव्यास होते. माहितीनुसार, गुरुवारी रात्री हे दोघे आपल्या
दोन मुलींसह जेवण करून झोपी गेले होते. मात्र, शुक्रवारी २७ फेब्रुवारी २०२६
रोजी सकाळी सहाच्या सुमारास दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांच्या तोंडातून फेस
येत असल्याचे मुलींनी पाहिले. आई-वडील उठत नसल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या
मुलींनी तातडीने आपल्या काकांना फोन करून माहिती दिली. काकांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना तात्काळ श्री छत्रपती
शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, तोंडातून फेस येत असल्याने
विषप्राशनाचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी
घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवालानंतर
मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे कलावती नगर परिसरात
भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे. दोन लहान मुलींच्या डोळ्यासमोर घडलेल्या या
प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.