कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. राहुल देशपांडे यांचे आज व्याख्यान

सोलापूर:  सोलापूरचे अक्षयभूषण म. बं. तथा कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते आणि चिंतक डॉ. राहुल देशपांडे यांचे ‘देव ते देवत्व : एक नवा शोध’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. आज शुक्रवार, 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता श्री सिध्देश्वर देवस्थान शिक्षण संकुल व श्री संगमेश्वर शिक्षण संकुल संचलित कर्मयोगी अप्पासाहेब काडादी प्रबोधन मंचाच्यावतीने संगमेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात हे व्याख्यान होणार आहे. व्यवसायाने बालदंत शल्यचिकित्सक असलेले डॉ. राहुल देशपांडे हे भारतीय इतिहास, संस्कृती, तत्त्वज्ञान, वेदशास्त्र इत्यादींचे चतुरस्र अभ्यासक आहेत. त्यातही मंदिरांच्या अभ्यासाचा त्यांचा लौकिक आहे.देव म्हणजे नेमके काय? तो फक्त मंदिरात आहे का? मूर्ती, पूजा, परंपरा, संत वचने या सार्‍यांच्या पलीकडे दडलेल्या सत्याचे दर्शन हा डॉ. देशपांडे यांच्या चिंतनाचा विषय आहे. श्रध्देला नवी दिशा देणारी आणि स्वतःशी भेट घडवत अंतर्मनाला स्पर्श करणारी ही आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी शिक्षकांसह पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कर्मयोगी अप्पासाहेब काडादी प्रबोधन मंचने केले आहे.