आता विधान परिषद निवडणुकीचे वेध
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा
निवडणुकांची धामधूम पाहायला मिळणार आहे. येत्या काही दिवसांत विधान परिषद
निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असून, एकूण 26 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत
विधानसभेच्या सदस्यांमधून निवडून द्यायच्या 9 जागा आणि स्थानिक स्वराज्य
संस्थांमधील तब्बल 17 रिक्त जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, 9 जागांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे. या जागांमध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत
शिंदे आणि राजेश राठोड यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. सध्याच्या विधानसभेतील
संख्याबळ पाहता भाजपला 5 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडीला 1
जागा मिळू शकते. मात्र, अतिरिक्त मतांमुळे आणि उमेदवारीतील
बदलांमुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असून, चुरशीची
लढत अपेक्षित आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागा गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त
आहेत. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका न झाल्यामुळे या जागांवर मतदान होऊ
शकले नव्हते. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने 75 टक्के मतदार निकष लागू करत या जागा
भरण्याची तयारी सुरू केली आहे.सोलापूर, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे
यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांसह अनेक भागांमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता
आहे. आयोगाच्या नव्या नियमांमुळे तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यामुळे आता राजकीय हालचालीसह मोर्चेबांधणीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर
महायुती आपले वर्चस्व कायम राखण्याच्या तयारीत आहे, तर
महाविकास आघाडी जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी जोरदार रणनीती आखत आहे. कोकण,
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जागांवर विशेष लक्ष केंद्रीत
करण्यात आले आहे.