दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये अग्रीम मदत म्हणून जमा केले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठीच्या आर्थिक मदतीची माहिती दिली.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट

पावसाअभावी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आणि पशुधन सांभाळण्याचे वाढते आव्हान यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. दुष्काळाशी संबंधित मदतीची संपूर्ण प्रक्रिया दिवाळीपूर्वी पूर्ण करणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, या उद्देशाने अग्रीम रक्कम देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

“दिवाळीआधी ५ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. सरकार बळीराजाच्या पाठीशी आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मराठवाड्यात पाणीटंचाईवर उपाययोजना

मराठवाड्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. काही भागांत पाण्याची पातळी तीन मीटरपेक्षा खाली गेल्याचे त्यांनी नमूद केले. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून पाण्याचे टँकर सुरू करण्यात येतील आणि त्यांचे जीपीएसद्वारे ट्रॅकिंग केले जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, पाण्याचे १६ हजार बेकायदेशीर कनेक्शन तोडण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा राखून ठेवणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.