पंढरपुरात शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांची गोळ्या झाडून हत्या; राहत्या घराजवळ हल्ला, परिसरात खळबळ
पंढरपूर : पंढरपूर शहरात गोळीबाराची खळबळजनक घटना घडली असून, शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात
आली आहे. इसबावी येथील त्यांच्या राहत्या घराजवळ मंगळवारी रात्री सुमारे १०
वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे
पंढरपूर शहरात खळबळ उडाली आहे.
राहत्या घराजवळ गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, राजाभाऊ भिंगे हे इसबावी येथील आपल्या
घराजवळ असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळी झाडली. गोळीबारानंतर हल्लेखोर
घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात भिंगे गंभीर जखमी झाले.
उपचारादरम्यान मृत्यू
गोळीबारात जखमी झालेल्या राजाभाऊ भिंगे यांना तातडीने
पंढरपूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच समर्थक,
कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
दुधनीतील हत्येच्या घटनेचीही आठवण
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील दुधनी येथे मोबाईल दुकानात घुसून महेश धानप्पा गुड्डोडगी (वय ३०) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातून चौघांनी दुकानात घुसून त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी मृताचा भाऊ शिवकुमार गुड्डोडगी यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पंढरपुरातील राजाभाऊ भिंगे यांच्या हत्येच्या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला आहे.