हडपसरमध्ये मध्यरात्री भीषण आग; १९ झोपड्या भस्मसात, मोठी दुर्घटना टळली
हडपसर भागातीलराम मनोहर लोहिया उद्यान परिसरात शनिवारी
मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या
मजुरांच्या वसाहतीतील एका झोपडीला पहाटे अडीचच्या सुमारास आग लागली आणि क्षणात ती
संपूर्ण परिसरात पसरली. झोपड्या तात्पुरत्या स्वरूपात बांबू आणि पत्र्याचा वापर
करून उभारण्यात आल्या होत्या. गृहोपयोगी साहित्याला आग लागल्यानंतर ज्वाळा वेगाने
भडकल्या. शेजारील झोपड्यांनीही पेट घेतल्याने आगीचे स्वरूप भीषण झाले. आग लागताच
वसाहतीतील मजूर आणि त्यांचे कुटुंबीय तत्काळ बाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना
टळली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन
दलाचे पाच बंब आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांच्या
मार्गदर्शनाखाली जवानांनी चहुबाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला. जवळपास दोन
तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत एकूण १९ झोपड्या
जळून खाक झाल्या असून तीन दुचाकीही आगीत भस्मसात झाल्या. कपडे, धान्य आणि इतर घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. मध्यरात्री आग
लागल्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती; मात्र
प्रसंगावधान राखल्यामुळे अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून
याबाबत अधिक तपास सुरू आहे.