देवरहिप्परगी येथे पत्नीची निर्घृण हत्या २४ दिवसांनंतर प्रकरण उघड – मृतदेह घराच्या अंगणातच पुरला

विजयपूर:-विजयपूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी येथे पतीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घराच्या अंगणात पुरल्याची धक्कादायक घटना २४ दिवसांनंतर उघडकीस आली आहे.मृत पत्नीची ओळख सरोजिनी रत्नाकर (वय ४५) अशी असून आरोपी पती प्रभू रत्नाकर (वय ४६) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभू रत्नाकर याने पत्नी सरोजिनी यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. कर्जाच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. गेल्या २३ जानेवारीच्या रात्री झालेला वाद विकोपाला गेला आणि २४ जानेवारी रोजी प्रभू रत्नाकर याने पत्नीच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून तिची हत्या केली, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने मृतदेह घराच्या अंगणात पुरून ठेवला होता. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी प्रभू रत्नाकर यानेच देवरहिप्परगी पोलीस ठाणे येथे पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांना त्याच्या वागणुकीवर संशय आल्याने सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यानेच हत्या केल्याची कबुली दिली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी प्रकरणाची माहिती दिली. प्रभूने कर्ज फेडण्यासाठी पत्नीचा धनादेश दिला होता. तो धनादेश बाउन्स झाल्याने त्यासंदर्भातही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कर्जाचा ताण आणि कौटुंबिक कलह हेच हत्येचे कारण असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

सरोजिनी यांच्या आई कमलव्वा मेलिनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रभू रत्नाकर याचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू आहे.