भाजपा निलंबित आमदार यतनाळ यांच्या सोबत दिसल्यास कारवाई करण्याचा जिल्हा अध्यक्षांचा इशारा

विजयपूर : भाजपचे महापालिका सदस्य जर पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदार बसनगौडा पाटील यतनाळ यांच्यासोबत दिसल्यास, त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यास त्यांच्यावर निश्चितच कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष गुरु‍लिंगप्पा अंगडी यांनी दिला.पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, भाजप सदस्य हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या आमदार यत्नाळ यांच्यासोबत सार्वजनिकरीत्या दिसणे योग्य नाही. अशीच कृती पुढेही सुरू राहिल्यास नक्कीच कारवाई करण्यात येईल. ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा आणि राज्य अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्याबाबत आमदार यत्नाळ यांनी केलेली टीका योग्य नाही. वारंवार अशी विधाने करणे अयोग्य आहे. विजयेंद्र हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्रीपदाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. मात्र, सध्या पक्षात नसलेले यत्नाळ आपण मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हणणे हास्यास्पद आहे. “येडियुरप्पांनीच मला वाढवले, भाजपमध्ये आणले,” असे आपणच सांगितले होते. मग अशा व्यक्तींविरुद्ध आता वक्तव्य करणे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण पक्षातून निलंबित आहात आणि पक्ष कार्यालयात येत नाही. त्यामुळे येथील परिस्थिती आपल्याला माहीत नाही. एकदा चूक केल्यामुळे पक्षाबाहेर गेलेले आपण पुन्हा पक्षात येण्यासाठीच अशी विधाने करत आहात, असेही ते म्हणाले.राज्य सरकारने हजार दिवसांच्या कामगिरीचा दावा केला असला तरी हजार समस्या निर्माण केल्या आहेत. सध्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू असून विजयपूर जिल्ह्याच्या प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर एम. बी. पाटील आणि शिवानंद पाटील यांनी पक्षभेद बाजूला ठेवून बैठक बोलवावी. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच शहरातील उड्डाणपूल यांसारख्या विविध मुद्द्यांवर चर्चा व्हावी. जिल्ह्याशी संबंधित बाबी अर्थसंकल्पात जाहीर करण्यासाठी सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी अंगडी यांनी केली.या पत्रकार परिषदेला भाजप नेते डॉ. सुरेश बिरादार, चिदानंद चलवादी, विजय जोशी आदी उपस्थित होते.