कोट्यवधींचा खर्च करूनही धर्मवीर संभाजी महाराज तलावात कचऱ्याचे साम्राज्य; जलपर्णीच्या वाढीने सुशोभीकरणावर पाणी

सोलापूर : विजापूर रोड परिसरातील धर्मवीर संभाजी महाराज तलावात मोठ्या प्रमाणात कचरा तरंगताना दिसत असून, तलावाच्या काठावरही प्लास्टिक आणि केरकचरा साचत आहे. नागरिकांकडून बिनदिक्कतपणे कचरा टाकला जात असल्याने तलावाचे विद्रुपीकरण होत आहे. तसेच पाण्यात कचरा साचल्यामुळे जलपर्णीची वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.

कोट्यवधींचा खर्च, तरीही तलावाची दुरवस्था

धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्या सुशोभीकरणासाठी अलीकडेच कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, सध्या तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात केरकचरा आणि प्लास्टिक टाकले जात असल्याने सुशोभीकरणावर पाणी फेरले जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तलावाच्या काठावर साचलेला कचरा आणि पाण्यात तरंगणाऱ्या प्लास्टिकमुळे परिसराचे सौंदर्यही बाधित होत आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी

तलाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाबरोबरच परिसरातील नागरिकांचीही आहे. मात्र, तलावात आणि परिसरात कचरा टाकण्याचे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तलाव परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवावे. तसेच तलावात किंवा तलावाच्या काठावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सोलापूरकरांनी केली आहे.

सुशोभीकरणानंतर तलावाची स्वच्छता आणि देखभाल राखण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियमित स्वच्छतेबरोबरच कचरा टाकण्यास प्रतिबंध करणाऱ्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.