पंढरपूर तालुक्यातील जळोलीत बंद बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील जळोली येथे शेतातील बंद बोअरवेलमध्ये पडलेल्या
दीड वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उष्मती राहुल गावित (वय १.५ वर्षे, रा.
शिसा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) असे
मृत बालिकेचे नाव आहे. या घटनेमुळे जळोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रात्री आठच्या सुमारास बोअरवेलमध्ये पडली
२२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जळोली येथील
साखर कारखान्यालगत गोरख कांतिलाल नरसाळे यांच्या शेतातील बंद बोअरवेलमध्ये ऊसतोड
मजुराची ही बालिका पडली. अंदाजे ४५ ते ५० फूट खोलवर बालिका अडकल्याची माहिती
मिळताच प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
रात्रभर युद्धपातळीवर बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी
सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, करकंब
पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, बीट अंमलदार, पोलीस पाटील तसेच दोन बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. बालिकेला सुरक्षित
बाहेर काढण्यासाठी रात्रभर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते.
सकाळी बाहेर काढले; मात्र मृत्यू
२३ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बचाव पथकाला बालिकेला
बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
रात्रभर सुरू असलेल्या बचावकार्याला यश मिळाले, पण बालिकेचा
जीव वाचू न शकल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.