प्रेमविवाहानंतर हुंड्यासाठी विवाहितेचा छळ? पूजाच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांना अटक
सांगली : प्रेमविवाहानंतर सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ होत
असल्याच्या आरोपातून सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक धक्कादायक प्रकरण
समोर आले आहे. पाडळी येथील पूजा शिवम पाटील (वय २४) या विवाहितेने २२ सप्टेंबर
२०२६ रोजी राहत्या घरी स्वतःला पेटवून घेतले होते. या घटनेत त्या गंभीर भाजल्या
होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू आणि
सासऱ्यांना अटक केली आहे.
पित्याच्या तक्रारीवरून तिघांना अटक
मृत पूजाचे वडील रवींद्र शामराव शिंदे (वय ५७, रा. शिराळा) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या
तक्रारीवरून पोलिसांनी पती शिवम सुरेश पाटील, सासू सुमित्रा
सुरेश पाटील आणि सासरे सुरेश खंदू पाटील यांच्याविरोधात कारवाई केली. तिघांनाही
बुधवारी अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
लग्नातील मानपान आणि घर बांधण्यासाठी पैशांचा तगादा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा हिने शिवम पाटील याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र, विवाहानंतर काही दिवसांतच म्हणजे ७ जून २०२३ पासून सासरच्या मंडळींकडून
तिचा छळ सुरू झाल्याचा आरोप आहे. लग्नात योग्य मानपान केला नाही, तसेच नवीन घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, असा
दबाव तिच्यावर टाकला जात होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात
आले आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून पूजाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे
१२ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतल्याचे
वृत्त आहे. गंभीर भाजल्याने तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र,
उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पायल झांबरे प्रकरणानंतर पुन्हा कौटुंबिक छळाचा मुद्दा
चर्चेत
पुण्यातील मुकुंदनगर परिसरातील पायल झांबरे यांच्या
मृत्यू प्रकरणानंतर सांगलीतील पूजाच्या घटनेनेही कौटुंबिक छळाचा प्रश्न पुन्हा
ऐरणीवर आला आहे. पायल यांच्या मृत्यूप्रकरणी माहेरच्या मंडळींनी सासरच्यांकडून
सोन्याच्या मागणीसाठी छळ झाल्याचा आरोप केला होता. या दोन्ही घटनांमुळे विवाहित
महिलांवरील कथित आर्थिक दबाव आणि कौटुंबिक छळाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पूजा
पाटील मृत्यू प्रकरणात पोलिसांनी पती आणि सासू-सासऱ्यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.