लिंगायत भवनसाठी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांची मदत घेणार; देवेंद्र कोठेंचे आश्वासन

सोलापूर : वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या लिंगायत भवनच्या कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सहकार्य घेऊन लिंगायत भवनचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे, असे आश्वासन आमदार देवेंद्र कोठे यांनी दिले. वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे लिंगशेट्टी मंगल कार्यालयात आयोजित १२ व्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला काशीपीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, जगद्गुरू श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, नागणसूर मठाचे श्री श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार बसवराज पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, स्थायी समिती सभापती तथा मेळाव्याच्या स्वागताध्यक्षा रंजिता चाकोते, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, माजी आमदार शिवशरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

६८ लिंग मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ६.८० कोटींची मागणी

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की, ज्या गावात जन्मलो त्या गावच्या लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामदैवतासाठी काम करणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंग मंदिराच्या जीर्णोद्धार आणि पुनर्विकासासाठी शासनाकडे ६ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्यापैकी दोन कोटी रुपये मंजूर झाले असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. श्री सिद्धरामेश्वर यात्रेदरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत या पुनर्विकास कामाचा प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मोची, लोधी आणि तेलगू समाजाच्या भवनांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. लिंगायत समाजाकडून शहर मध्य मतदारसंघात भवनाचा प्रस्ताव आल्यास त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची जबाबदारी आपली असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. विष्णुपंत नगर येथील मठासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

लिंगायत भवनसाठी लोकप्रतिनिधींकडून निधी

लिंगायत भवनच्या उभारणीसाठी दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांनी ७५ लाख रुपये, विद्यमान महापौर विनायक कोंड्याल यांनी ३० लाख रुपये, तर स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. लिंगायत भवन भव्य स्वरूपात साकारण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून स्वतः प्रयत्न करणार असल्याचे आमदार कोठे यांनी स्पष्ट केले.

श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्याची अपेक्षा

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराचा विकास करताना मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविणे आवश्यक असल्याचे मत आमदार कोठे यांनी व्यक्त केले. वाराणसी, अयोध्या, हरिद्वार यांसारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये मंदिरांच्या जीर्णोद्धारासोबत परिसर विकास आणि कॉरिडॉरची कामे करण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर श्री सिद्धरामेश्वर मंदिराचा विकास व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत असताना महापालिका आणि संबंधित प्रशासनानेही कायदेशीर कारवाईबाबत कठोर भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. शैलेश पाटील, राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर शिवदारे, राजशेखर विजापुरे, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, नगरसेवक अक्षय अंजिखाने, बिज्जू प्रधाने, रुद्रेश बोरामणी, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, केदार उंबरजे, सुधीर मळशेट्टी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.