दिवाळीच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला! ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी; आईचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

कराड : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कराडजवळील मलकापूर शहरात भीषण अपघात घडला. ढेबेवाडी फाट्याजवळ ऊसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक पलटी झाल्याने ट्रॉलीखाली सापडलेल्या मालन मोहन सुतार (वय ६०, रा. काढणे, ता. पाटण) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा यशवंत मोहन सुतार (वय २८) जखमी झाला असून त्याच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

ट्रॉलीखाली दुचाकीस्वारांसह काहीजण अडकल्याची भीती

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूरमधील ढेबेवाडी फाट्याजवळ ऊसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक पलटी झाली. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या दोन दुचाकींसह काहीजण ट्रॉलीखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. उसाच्या ढिगाऱ्याखालून एका दुचाकीस्वाराला बाहेर काढण्यात यश आले.

आईचा मृत्यू, मुलगा जखमी

या अपघातात मालन सुतार आणि त्यांचा मुलगा यशवंत हे दोघेही ट्रॉलीखाली अडकले होते. नागरिक आणि पोलिसांनी युद्धपातळीवर बचावकार्य करत दोघांनाही बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत मालन सुतार यांचा मृत्यू झाला. जखमी यशवंत याला तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांसह नागरिकांकडून बचावकार्य

अपघातामुळे मलकापूर परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नगरसेवक सूरज शेवाळे, दादासाहेब शिंगण, धनंजय येडगे यांच्यासह कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, वाहतूक शाखेचे प्रभारी संदीप साळुंखे, महामार्ग पोलीस निरीक्षक अमृत बाबर, अशोक भापकर, निखिल मगदूम तसेच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी बचावकार्यात सहभाग घेतला.दिवाळीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.