सोलापुरात भीषण अपघातअवजड वाहनाची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
सोलापूर शहरात सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात
घडला. Solapur येथील जोडभावी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला
जोरदार धडक दिल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये नागेश प्रकाश
गवंडी (वय २५, रा. राजेंद्र चौक), रोहन
कोरे (वय २४, रा. सोलापूर शहर) आणि प्रज्वल चनशेट्टी (वय २५,
रा. शेळगी) यांचा समावेश आहे. तिघेही दुचाकीवरून घरी परतत असताना हा
अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
पहाटे पोलिसांचा फोन; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
नागेश गवंडी हा जिल्ह्यातील नातेपुते येथील टोल नाक्यावर
सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. महाशिवरात्रीनिमित्त तो घरी आला होता. रविवारी
रात्री मित्रांसोबत बाहेर गेल्यानंतर रात्री १२ वाजता बहिणीने त्याला फोन करून घरी
येण्याची विचारणा केली होती. “येते आहे, मित्रांसोबत आहे,” असे
त्याने सांगितल्याचे बहिणीने सांगितले. मात्र पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांचा फोन
आला आणि रुग्णालयात जाऊन नागेशचा मृतदेह ओळखावा लागला, अशी
माहिती कुटुंबीयांनी दिली.
अपघात की काही वेगळा प्रकार?
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार अज्ञात अवजड वाहनाने
धडक दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र नागेशच्या बहिणीने
माध्यमांसमोर संशय व्यक्त करत, “माझ्या भावाला जास्त मार लागलेला दिसत
नाही, मग त्याचा मृत्यू कसा झाला?” असा
सवाल उपस्थित केला आहे. Jodbhavi Peth Police Station येथील
अधिकारी घटनास्थळ परिसरातील विविध ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत
असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सोलापुरात हळहळ व्यक्त
नागेश गवंडी, रोहन कोरे आणि प्रज्वल चनशेट्टी हे तिघेही पंचविशीतील तरुण होते. रोहन कोरे बजाज फायनान्समध्ये कार्यरत होता, तर प्रज्वल एका खासगी कंपनीत काम करत होता. अकाली मृत्यूमुळे सोलापूर शहरात शोककळा पसरली असून मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस तपासानंतरच अपघाताबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.