सोलापूर-मुंबई वंदे भारत सुसाट; प्रवाशांची एक्स्प्रेसला पसंती, वेळेची बचत आणि सुविधा ठरल्या आकर्षण

भारतीय रेल्वे अंतर्गत सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या सोलापूर-पुणे-मुंबई मार्गाला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल 23.43 लाख प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला असून, जानेवारी 2026 पर्यंत सरासरी 102.27 टक्के ऑक्युपन्सी नोंदली गेली आहे.

9 फेब्रुवारी 2023 रोजी सुरुवात सोलापूर आणि पुणे विभागातून वंदे भारत सुरू करण्याची मागणी होत असताना 9 फेब्रुवारी 2023 रोजी सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस धावू लागली. अल्पावधीतच या गाडीने प्रवासीसंख्या, वेळेची बचत आणि आधुनिक सुविधा या तिन्ही बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुणे-मुंबई मार्गावर सर्वाधिक गर्दी सोलापूर-पुणे-मुंबई असा पूर्ण प्रवास करणाऱ्या या गाडीला विशेषतः पुणे-मुंबई-पुणे मार्गावर मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांत या टप्प्यावरच सुमारे 13.5 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. मुंबईत नोकरी किंवा व्यवसायासाठी जाणाऱ्या पुणेकरांसाठी सकाळची अतिरिक्त जलद सेवा उपलब्ध झाल्याने मोठा फायदा झाला आहे. वेळेची मोठी बचत ही गाडी पुणे-सोलापूर-पुणे असे 455 किलोमीटर अंतर अवघ्या 6 तास 30 मिनिटांत पूर्ण करते. पारंपरिक सुपरफास्ट गाड्यांच्या तुलनेत सुमारे दीड तासांचा वेळ वाचतो. कुर्डुवाडी, दौंड, पुणे, कल्याण, ठाणे आणि दादर हे महत्त्वाचे थांबे असून सेवा सध्या आठवड्यातून सहा दिवस धावते. वाढती मागणी; डबे वाढवले प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन ऑगस्ट 2025 मध्ये या गाडीला 16 ऐवजी 20 डब्यांचा रेक जोडण्यात आला. त्यामुळे आसनक्षमता 1,440 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड पुश-अँड-पुल तंत्रज्ञानामुळे भोरघाटासारख्या अवघड घाट विभागातूनही बँकर लोकोशिवाय गाडीची सुरळीत धाव शक्य झाली आहे. यामुळे वेळेची बचत आणि सुरक्षित प्रवास दोन्ही साध्य झाले आहे. एकूणच, सोलापूर-पुणे-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसने तीन वर्षांत प्रवाशांच्या पसंतीची जलद आणि आधुनिक सेवा म्हणून आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.