‘वोट चोरी’विरोधातील आंदोलनासाठी सोलापूर काँग्रेसचे पदाधिकारी दिल्लीला रवाना; प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहभाग

सोलापूर : देशाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आदेशानुसार, खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. कथित ‘वोट चोरी’च्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांविरोधात होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी गुरुवारी सकाळी कर्नाटक एक्स्प्रेसने दिल्लीकडे रवाना झाले.

दिल्लीला रवाना होण्यापूर्वी सोलापूर रेल्वे स्थानकावर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली. देशभरात कथित ‘वोट चोरी’च्या मुद्द्यावरून निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी जनमत संघटित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे ४०० ते ५०० काँग्रेस पदाधिकारी पाच दिवसांत टप्प्याटप्प्याने दिल्लीला रवाना होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. या दौऱ्यात सोलापूर शहर दक्षिण युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अनंत म्हेत्रे, उत्तर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे, शहर उपाध्यक्ष सचिन पवार, धीरज खंदारे, शशिकांत शेळके, महेंद्र शिंदे, योगेश रणधीरे, अमोगसिद्ध ख्याडे, आकाश नाईक, प्रदीप ख्याडे, राहुल भागवत आणि चंद्रकांत नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले आहेत.