सोलापुरातील समाचार चौकाचा कायापालट; कचरा कुंडीच्या जागी आकर्षक बगीचा, फाउंटनमुळे परिसर खुलला
सोलापूर : शहरातील समाचार चौक परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून
कचरा कुंडीची समस्या होती. मुख्य चौकातच मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने
परिसरात अस्वच्छता पसरत होती. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला
होता, तसेच चौकाच्या सौंदर्यावरही परिणाम होत होता. मात्र, आता या समस्येवर उपाय करण्यात आला असून, कचरा
कुंडीच्या जागी आकर्षक बगीचा विकसित करण्यात आला आहे.
नगरसेवक अमर पुदाले यांचा पुढाकार
समाचार चौकातील कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन या भागातील
नगरसेवक अमर पुदाले यांनी पुढाकार घेतला. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या स्थानिक
विकास निधीतून या परिसराचा कायापालट करण्यात आला. कचरा कुंडी पूर्णपणे हटवून
जागेची स्वच्छता करण्यात आली आणि त्यानंतर परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले.
बगीचा, फाउंटन आणि विद्युत रोषणाई
पूर्वी ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत होते, त्या जागी आता सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. परिसरात फुलझाडे आणि
हिरवळ विकसित करण्यात आली असून, आकर्षक फाउंटनही बसवण्यात
आला आहे. याशिवाय विद्युत रोषणाईमुळे चौकाचे सौंदर्य अधिक खुलले आहे.
परिसर बनला नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र
या बदलामुळे समाचार चौक परिसराला नवे रूप मिळाले आहे.
संध्याकाळच्या वेळी विद्युत रोषणाई आणि फाउंटन पाहण्यासाठी नागरिक येथे येत आहेत.
तरुण-तरुणींसाठी हा परिसर सेल्फी पॉईंट बनला असून, येथे फोटो काढण्यासाठी नागरिकांची गर्दी
होत आहे. कचऱ्याच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या बदलामुळे दिलासा
मिळाला आहे. परिसरातील अस्वच्छता दूर झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले
जात आहे. नगरसेवक अमर पुदाले यांनी याबाबत अधिक माहिती दिली.