शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; काळजीचे कारण नाही, सुप्रिया सुळेंची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती देताना शरद पवार यांच्या प्रकृतीची काळजी करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले. त्यांना डिहायड्रेशनचा त्रास झाला असण्याची शक्यता असल्याचेही सुळे यांनी सांगितले.

डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी सध्या त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच प्रवास कमी करावा आणि कामाचा वेग काहीसा कमी ठेवावा, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

‘बाबा माझं ऐकतच नाहीत’; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या काम करण्याच्या सवयीबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बाबा माझं ऐकतच नाहीत. कामाशिवाय ते राहत नाहीत. काम करण्याची त्यांना खूप आवड आहे.” शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करणाऱ्या आणि त्यांना शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचेही त्यांनी आभार मानले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित असलेल्या सुप्रिया सुळे तेथूनच ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना झाल्या.

यापूर्वीही झाले होते रुग्णालयात उपचार

यापूर्वी पुण्यात उपचार झाल्यानंतर शरद पवार यांना पुढील तपासणीसाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. डॉक्टरांनी त्यावेळीही त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, दुष्काळी भागातील दौरे आणि सततच्या कामामुळे त्यांना थकवा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत काळजीचे कारण नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.