छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय राडा; अंबादास दानवे यांनी भाजप सदस्याची कॉलर पकडली

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राजकीय गोंधळ उडाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप सदस्य कल्याण गायकवाड यांची भररस्त्यात कॉलर पकडल्याने पंचायत समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून दानवे कार्यकर्त्यांसह हातात काठी घेऊन पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर बसल्याचे पाहायला मिळाले.

सत्ता आणि पैशाचा गैरवापर’

आमचे सदस्य कुठे आहेत?” असा जाब विचारत अंबादास दानवे यांनी कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडली. यावेळी ठाकरेसेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. “आमच्या तीन सदस्यांना भाजपने सत्तेची ताकद आणि पैशाचा वापर करून पळवले आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू असून आम्ही हे सहन करणार नाही,” असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणावर आपण लवकरच सविस्तर खुलासा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राजकीय गणिते बदलणार?

आज जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांचे भवितव्य ठरणार आहे. ठाकरेसेनेने ज्या पक्षाला अध्यक्षपद मिळेल त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पठाण पंचायत समिती मात्र निर्विवादपणे शिंदेसेनेच्या ताब्यात राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीत भाजपला रोखण्यासाठी उद्धवसेना आणि शिंदेसेना एकत्र येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरू

जिल्हाधिकारी Dilip Swami यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दुपारी २ वाजता विशेष सभा होणार आहे. पीठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Rural Development Department Maharashtra च्या आदेशानुसार २० मार्चपूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र आज झालेल्या गोंधळामुळे निवडणुकीच्या निकालावर आणि पुढील राजकीय युतीवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.